Sunday, July 1, 2018

पाऊस





रखरखत्या उन्हाळ्यानंतर चाहूल लागते ती पावसाची. प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहात असतो आणि एके दिवशी आकाशात ढगांची गर्दी दाटू लागते, आभाळ भरून येते ,गार वारा सुटतो आणि पावसाचे थेंब बरसू लागतात. मातीचा सुगंध सुटतो.

                                     पहिल्या पावसाच्या सरी अंगावर झेलायला मला खूप आवडते त्यात कागदाच्या होडी बनवून मुलासोबत त्या पाण्यात सोडण्याचा आनंदच वेगळा असतो.



                  प्रत्येक ऋतूंमधले वातावरण छानच असते. पावसाळ्यात सगळीकडे हिरवेगार झालेले असते. फुलं-झाडे  बहरलेली असतात. गुलमोहोर जो आता कमी होत चाललाय लालचुटुक फुलांनी गच्च भरलेला असतो आणि त्याच दिवसात सणांची रेलचेल असते. मग दुर्वा, आघाडा, बेल  पूजेसाठी गोळा करायचे. श्रावण महिन्यातल्या कहाण्या, स्तोत्रे, आरत्या आणि त्यासोबत दरवळणारा उदबत्ती आणि धुपाचा सुवास.

                      ऋतूनुसार भाज्या फळे बदलत जातात. मीठ लावलेली जांभळं, गरम भाजलेल्या भूईमूगाच्या शेंगा, मुगाची खिचडी आणि टमाट्याचे सार, पापड  या दिवसात खायला मजा येते. सगळी धरणी थंड झालेली असते आणि त्याचबरोबर होणारा चिखलही नकोसा असतो.

            आभाळ आलेले असताना कुठेतरी मस्तपैकी फिरायला जाणे तेही गाडीवर. आजच्या धावपळीच्या युगात पावसाचा आनंद घ्यायलाही वेळ मिळत नाही. पण त्यातूनही शक्यतो वेळ काढावाच. कामामुळे आलेला थकवा दूर होतो. पाऊस पडत असताना छान गाणी ऐकत गरमागरम कांदाभजी आणि  चहाचा आस्वाद घेणे, वाह! छानच.


                     "ग्रीष्म संपला वसंत सुरु झाला, थंडगार वारा पुन्हा अंगाशी झोंबू लागला,
             ढगांचा गडगडाट , विजेचा कडकडाट, मराठी मातीचा सुगंध पुन्हा दरवळला,
                       बेभान वारा  येणाऱ्या त्या धारा, या क्षणांचा आहे रंगच न्यारा". (unknown)

Friday, November 24, 2017

थंडीतले दिवस


         


दिवाळी आली कि थंडीची चाहूल लागते. पहाटे उठून कार्तिक स्नान करायचे. अंगणात सडा रांगोळी करायचे,त्यात शेणाने सारवलेले असेल तर मग खूपच छान.


                                            कुठेतरी चुलीवर पाणी तापत असताना त्या लाकडांचा किंवा शेणाच्या गौऱ्यांचा वास, कोंबड्याचे आरवणे,गायींच्या गळ्यातल्या घंट्यांचा आवाज,मंदिरात चाललेल्या काकडा आरतीचा आवाज  ऐकू येतो. मग स्नान करून देवपूजा आणि देवाला आवळ्याची वात लावलेला दिवा.
                                                     या दिवसात खायची पण चंगळ असते, गरम गरम भाकरी त्यावर साजूक तूप नाहीतर लोण्याचा गोळा, वांग्याचे भरीत सोबत मेथीचा खुडा,ठेचा, भुरकी, कांदा, पेरू, आवळे, बोरं,हरियाल बूट, मटारच्या शेंगा आणि हुरडा. शेतात जाऊन हुरडा खाण्याची मजाच वेगळी असते आणि या दिवसात भूक वाढलेलीच असते. डिंकाचे-उडदाचे-मेथ्याचे लाडू खायचे.





           
                      निसर्गाच्या सानिध्यात वेळ देता यावा म्हणून आवळी भोजन याच दिवसात असते.आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करणे म्हणजे आवळीभोजन. चहाचे कॉफीचे घोट घेत घेत सुरेल गाणी ऐकत बसायचे तेही सकाळच्या कोवळ्या उन्हात.
                           आणि यासोबत असते ती गुलाबी कुडकुडणारी थंडी. मस्त शेकोटी करून शेकत बसायचे.





Sunday, July 13, 2014

आई

माझी आई  …। माझी मैत्रीण, माझ्यासाठी सर्व काही. जिच्यासोबत मी सर्व काही शेयर  करते. सर्वात जास्त आईची उणीव मला लग्नानंतर भासली. कोणतीही गोष्ट तिला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. नेहमीच ती माझी खूप काळजी घेते, मला प्रोत्साहन देते, धीर देते. 

              काहीही घ्यायचे असले कि आम्ही सोबत जातो पण तुला काय घ्यायचे असे विचारले कि "तुला काय घ्यायचे ते घे मला नंतर घेईन" असे म्हणत असते. खायच्या बाबतीतही तसेच. मग मीच तिला बळजबरी खायला लावायची. खूप समाधानी आहे आईचा स्वभाव. एक वेळ मी हट्ट करेल हे घ्यायचे ते घ्यायचे पण ती कधीच नाही. तिला श्रीकृष्णाची खूप आवड आहे तर ती त्याचं काही भेटलं तर आवर्जून घेते. 

        तिने पहिल्यापासून ठरवले होते कि मला चांगलं शिकवायचं आणि स्वतःच्या पायावर उभे करायचे (म्हणजे कमवते  बनवायचे) आणि ते झालेही. तिला जे जे करायला भेटले नाही ते तसं माझं होऊ नये यासाठी ती लक्ष द्यायची. मलाही चित्रकलेची आवड आहे त्यामुळे मला जे पाहिजे ते सामान घेऊन द्यायची. कलाकुसरीच्या वस्तू बनवायला आम्हा दोघींना आवडते त्यामुळे आम्ही नेहमी नवीन काहीकाही बनवतो. आई मला नेहमी त्यात वेगवेगळ्या कल्पना सुचवते आणि कौतुकही करते. 

                             बरेचदा आईवर चिडायचे मी, कधी कधी दुसऱ्या गोष्टींचा राग तिच्यावर निघायचा पण अबोला कधीच धरला नाही तिच्याशी. वेळ मिळेल तेव्हा नवीन पाककृती सुध्दा दोघी आवडीने करून पाहतो. आमच्या सगळ्याच आवडी सारख्या आहेत, फुलझाडं, पक्षी, निसर्गरम्य वातावरण. प्रत्येक सणावाराला सजावट हौशीने करायचो आम्ही. माझ्या रांगोळीचे तिला नेहमी कौतुक वाटते. 

                                           खूप आठवण येते मला तिची. तिच्यासोबत घालवलेले क्षण आठवले कि डोळे भरून येतात. लग्न झाले नव्हते तेव्हा लोकं म्हणायचे कि किती दिवस आईवडिलांकडे राहायचे? पण आईवडिलांचा कधीच कंटाळा येत नसतो निदान मलातरी. मला नेहमी ह्या गोष्टींचा राग येतो कि का मुलींनाच लग्न झाले कि जन्मदात्यांना सोडून दुसऱ्या घरी जावे लागते, मुलं तर सोडायला तयार नसतात त्यांच्या आईवडिलांना. 

           आईकडे गेले कि तिच्या मांडीवर डोके ठेवून पडले कि मला खूप शांत वाटते. जन्मोजन्मी मला हेच आईवडील लाभावे. माझ्या भावानेदेखील माझ्यासाठी खूप केले आहे आणि अजूनही करतोच. माझे नातेवाईकहि वेळोवेळी मदतीला येतात, प्रसंगी धीरही देतात. आईची माया काही वेगळीच असते. कोणी काहीही म्हणले तरी मला जेव्हा आईकडे जावे वाटते तेव्हा मी जातेच. पण कितीही वेळ  थांबले तरी तो कमीच वाटतो मला. सासरी निघताना डोळ्यात पाणी येतेच तिच्याही आणि माझ्याही.


Sunday, July 6, 2014

संगीत


 संगीत - निसर्गाने मानवाला  दिलेली देणगी. संगीताने केवळ माणूसच नव्हे तर पशु पक्षी देखील प्रसन्न होतात. "आळविता वेणू धेनु गोळा होती"…………

          तसेच कितीही आजारी माणूस असेल आणि एखादे सुरेख भावपूर्ण गाणे त्याला ऐकवले तर तो देखील आनंदी होतो. संगीत आवडत नाही अशी फार थोडी माणसं असतील. न कळणारे बाळ देखील अंगाई गाईली तर झोपी जाते. एखादे दुखी गाणे कोणी मनापासून गात असेल तर डोळ्यातून अश्रू वाहू लागतात.


                शेतात शेतकरी मोट लावतो तेव्हा जे गाणे म्हणतो त्यामुळे त्याचे श्रम त्याला जाणवत नाही तसेच जात्यावर दळताना ओव्या म्हणत केव्हा दळण संपते कळत नाही. संगीत हे सर्व विश्व व्यापून आहे. त्याची अवीट गोडी जो तो आपल्या इच्छेनुसार मनसोक्त घेऊ शकतो.


                                  संगीताने मनातील भावना व्यक्त करू शकतो. प्रेयसीला गाण्यातून गोड हितगुज किंवा राग सांगू शकतो.  आपण एवढे भाग्यवान आहोत कि कितीतरी जुन्या गायक गायिकांनी त्यांच्या सुरेल आवाजात खूप गाणी गाऊन त्यांच्या रेकॉर्ड्स करून ठेवल्या आहेत. त्याचे फक्त जतन करून आपण ती अवीट गोडी चाखली पाहिजे. "ए मेरे वतन के लोगो,लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला,केव्हा तरी पहाटे, मुगल-ए-आझम, जीवन से भरी तेरी आंखे, अशी असंख्य अविस्मरणीय गाणी. 


                                                        संगीताची जादू कुणावर चालली नाही तर नवलच म्हणायचे. माझ्या घरात सगळ्यांनाच संगीताची आवड आहे आणि माझा मामाच तबला, बासरी, पेटी, बुलबुल तरंग, बाजा (मौथोर्गान) शिकवायचा. त्यानेच आम्हालापण शिकविले. लवकरच मी स्वतः कॅसिओवर गाणे वाजवायला शिकले. सुरांचे ज्ञान असले कि वेळ लागत नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळेल, लहर येईल तेव्हा मी गाणे वाजवते.


                        संगीत एक अशी कला आहे कि त्यामुळे मनाला एक प्रकारचा आनंद मिळतो. तणावाखाली असाल नाराज असाल आजारी असाल संगीतामुळे क्षणभर सारे विसरायला  होते. नैराश्य आले असेल तर रोज थोडा वेळ संगीत ऐकावे, मन हलके होते.


       संगीताचे प्रकार ते किती शास्त्रीय,हिंदी, मराठी,इंग्रजी, नाट्यसंगीत,वेगवेगळे राग, संगीतातले रागसुद्धा प्रत्येक प्रहरासाठी वेगवेगळे असतात. पहाटे, सकाळी,दुपारी,संध्याकाळी अशा प्रहरांसाठी ठरलेले राग आहेत.आजकाल नोकरी आणि घर यामधून खूप कमी वेळ मिळतो गाणे ऐकायला. गरोदरपणी मी बाळासाठी बासरी,संतूर वादन आवर्जून ऐकले होते.


                   "संगीत मन को बह्लाए, संगीत जीवन सुलझाये ;

                       संगीत बीना मन अधुरा, उसके बीना जीवन सुना." 


Sunday, June 29, 2014

पक्षी भाग-२

नविन घर दुसऱ्या मजल्यावर होते. त्यामुळे त्याला  ग्यालेरी होती एक. तिथेच दाणे व पाणी ठेवायची जागा केली. यावेळी ज्याचा कधी विचारही केला नव्हता ते पाहायला मिळाले. १-२ पोपट यायला लागले आणि हळूहळू ४-६-७ पोपट जमायला लागले.  ग्यालेरीजवळ नारळाचे झाड होते तिथे फांदीवर काही विजेच्या तारांवर येउन बसायचे. हळूच कोणी नाही याचा अंदाज घेत कट्ट्यावर यायचे. सकाळ,दुपार,संध्याकाळ पोपट येउन बसायचे. चिमण्यांसाठी जे तांदूळ ठेवायचो ते पोपट खायचे. अगदी कडकड आवाज करत. मग त्यांच्यासाठी खास रेशनचे तांदूळ आणून ठेवायचो. पोपटाला हिरवी मिरची, पेरू आवडतो म्हणतात पण हे पोपट ते सोडून फक्त तांदूळ खात होते. 

      एका पोपटाला गळ्यावर लाल डाग होता. त्याला दुसरा पोपट खाऊ दयायचा नाही. जवळ आला कि चोच मारायचा. तांदूळ संपले कि पोपट खूप आवाज करायचे. सकाळी तर सारखा पोपटांचाच आवाज असायचा. कबुतरे,पारवे, बुलबुल पक्षी,साळुंक्या, चिमण्यापण यायला लागल्या. कबुतरांना पोपट घाबरायचे. ते पोपटांना खाऊ द्यायचे नाही. उडवून लावायचे. 

             
                                           खारुताई अजून आली नव्हती. यावेळी खिडकीतून खूप videos आणि photos काढले. हळूहळू ते आम्ही असताना यायचे पण घाबरतच आणि लगेच उडून जायचे. नारळाच्या फांदीवर बसून वाट पाहायचे आम्ही जाण्याची. घरी येणाऱ्या प्रत्येकाला मजा वाटायची पोपट पाहायला. हे घर सोडण्याच्या काही दिवस आधी खारुताई आली होती एक दोनदा.त्याचबरोबर भारद्वाज सुद्धा खूप वेळा येउन गेला. तो पोळी खायचा. कावळापण पोळी खायचा पण ती पोळी तो पाण्यात बुडवून खायचा.

                   ग्यालेरीसमोर मस्त गुलमोहर फुललेला असायचा. त्याच्याखाली बिट्टीच्या पिवळ्या फुलांचे झाड होते. एका फोटोत तर गुलमोहराच्या फुलांमध्ये पोपट चोचीत पाकळी घेतलेला आला. 

                                   आता परत दुसऱ्या घरी जाणार होतो. पोपट तर नक्कीच कावरेबावरे होतील तांदूळ दिसले नाही तर. बघुयात नवीन घरी ते.