फुलांचं सौंदर्य अप्रतिम आहे. सर्वात जास्त कोणतं फुल आवडतं म्हणल्यावर पहिले आठवतो तो म्हणजे गुलाब,अनेक रंगांचा गुलाब,पण मग मोगऱ्याचा सुगंध येतो. त्याला पाहून आपोआप गजरा माळावा वाटतो. तसं पाहिलं तर गजरा म्हणलं कि जाई,जुई,कुंदाची फुले एका पाठोपाठ एक दिसू लागतात. हिरव्या वेलीवर छान डोलताना पाहात मन प्रसन्न होते. पण मग चाफा? झाडावर एकही पान नसताना सुद्धा बहरून येतो. मंद सुवासाचा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा. मला शेवंतीची फुलेही आवडतात. शेवंतीची वेणी दिसली कि घेतल्याशिवाय राहवत नहि. अबोलीला वास नसतो तरीपण नाजूक केशरी फुले उठून दिसतात. पुष्पगुच्छ म्हणलं कि निशिगंध आलाच. वा! किती सुरेख सुवास दरवळत राहतो त्याचा . एका मागोमाग एक फुले आठवायला लागतात. जास्वंदी, दुधमोगरा, कन्हेर,लिली,कमळ, पारिजात,झेंडू,कर्दळी,ब्रह्मकमळ,गोकर्ण कितीतरी असंख्य फुलांच्या जाती आहेत,त्यातही विविध रंगांच्या छटा. प्रत्येकाचं सौंदर्य निराळेच. मग कसं सांगणार कोणतं सर्वात जास्त आवडतं?
मला नेहमीचं वाटतं कि अंगणात छान बाग असावी, त्या बागेत निरनिराळी फुलझाडे असावी. सकाळ संध्याकाळ थंडगार हवेत झोका घेत घेत त्यांचं सौंदर्य न्याहाळत बसावं. ह्यातून मिळणारा आनंद खूप प्रसन्नता, स्फूर्ती देणारा असेल. फुलापानांची ओळख व्हावी व त्याची जोपासना करावी म्हणूनच प्रत्येक सणवाराला,कार्यक्रमाला,देवाला आवडतात म्हणून वाहण्याची प्रथा आहे.
प्रत्येकानेच हे निसर्गाचं सौंदर्य जपायला हवे. ह्यानेच तर निसर्गाचा समतोल राहायला मदत होत असते.

हो फुलांचं सौंदर्य अप्रतिम आहे. प्रत्येकानेच हे निसर्गाचं सौंदर्य जपायला हवे.
ReplyDelete